लिमिट सेट करण्याची थाप मारत सायबर भामट्यांनी 23 वर्षीय तरुणाच्या क्रेडिट कार्ड खात्यातून सव्वा लाख रुपये लंपास केल्याची घटना सुयोग कॉलनी परिसरात घडली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरद संजय परळीकर वय-23 (रा.सुयोग कॉलोनी, पद्मपूरा) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, वरदला एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून कॉल आला होता, समोरून बोलणार्या सायबर भामट्याने तुमचे क्रेडिट कार्ड ची लिमिट सेट करणे आहे, त्यासाठी तुमचा सीव्हीव्ही क्रमांक द्यावा लागेल, अशी थाप मारली. बँकेतून कॉल आल्याचे समजून वरदने क्रेडिट कार्डवरील सीव्हीव्ही क्रमांक त्या भामट्याला सांगितले. क्रमांक सांगताच क्रेडिट कार्ड खात्यातून 39 हजार 390 रुपये प्रत्येकी तीन वेळा काढण्यात आले. कार्ड मधून एकूण एक लाख 18 हजार 170 रुपये खात्यातून लंपास करण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वरदने पोलीस ठाणे गाठले, याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे करीत आहेत